MR/Prabhupada 0305 - आपण म्हणतो भगवंत अस्तित्वात नाहीत. आपण आपले डोळे स्वच्छ करायला हवेत



Lecture -- Seattle, October 2, 1968

प्रभुपाद : पुढे...

तमाल कृष्ण : "प्रत्येक जीव हा सूर्यप्रकाशाच्या सूक्ष्म रेणूप्रमाणे असतो, याउलट कृष्ण हे तळपत्या तेजस्वी सूर्याशी समतुल्य आहेत. भगवान चैतन्य जीवांची तुलना अग्नीच्या तेजस्वी स्फुल्लिंगांशी तर परमेश्वराची तुलना सूर्याच्या धधकत्या अग्नीशी करतात. यासंबंधी भगवान चैतन्य विष्णुपुराणातील एक श्लोक उद्धृत करतात, ज्यात हे प्रतिपादन केलेले आहे की या जगात अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या शक्ती आहेत. उदाहरणार्थ, जसे एका ठिकाणाहून उद्भवलेला अग्नी आपली उष्णता व प्रकाश सर्वत्र प्रकट करतो, त्याचप्रमाणे, भगवंत जरी आपल्या दिव्य धामात एकाच ठिकाणी स्थित असले, तरी आपली शक्ती सर्वत्र प्रकट करतात."

प्रभुपाद : आता, हे अत्यंत सरळ आहे. समजण्याचा प्रयत्न करा. जसे हा अग्नी, हा दिवा, एका विशिष्ट स्थानी उपस्थित आहे परंतु त्याचा प्रकाश सर्व खोलीत पसरला आहे, त्याचप्रमाणे, या जगात जे काही पाहता, हा सर्व परमेश्वराच्या शक्तीचा आविष्कार आहे. परमेश्वर एकाच ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपण आपल्या ब्रह्म-संहितेत म्हणतो : गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि | तेही एक व्यक्तीच आहेत. जसे की तुमचे राष्ट्राध्यक्ष, श्री. जॉन्सन, ते वाशिंग्टनमधील एका खोलीत बसलेले आहेत, परंतु त्यांचे सामर्थ्य व शक्ती संपूर्ण राष्ट्रात प्रभावी असते. जर हे भौतिकदृष्ट्या शक्य असेल, तर स्वतः ईश्वर, कृष्ण, जे सर्वोच्च व्यक्ती आहेत, ते एका ठिकाणी उपस्थित आहेत, वैकुंठ किंवा भगवद्धामात, परंतु त्यांची शक्ती कार्यरत आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे सूर्य. तुम्ही पाहता की सूर्य एका विशिष्ट ठिकाणी स्थिर असतो, परंतु तुम्ही हेही पाहता की त्याचा प्रकाश संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो. तो सूर्यप्रकाश तुमच्या खोलीतही असतो. त्याचप्रमाणे, जे काही तुमच्या अनुभवास येते, तुम्ही स्वतःसुद्धा, ते सर्व भगवंतांच्या शक्तीचा आविष्कार आहे. आपण त्यांच्याहून भिन्न नाहीत. पण जेव्हा मायेचा ढग आपल्या डोळ्यांना झाकून टाकतो, तेव्हा आपण सूर्य पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे, जेव्हा जीवनाची भौतिक संकल्पना आपल्याला झाकून टाकते, तेव्हा आपल्याला ईश्वराची जाणीव होत नाही. आपण म्हणतो ईश्वर अस्तित्वात नाही, परंतु आपल्याला या भ्रमापासून आपले डोळे मोकळे करावे लागतील. मग तुम्ही ईश्वराला प्रत्यक्ष पाहाल : "येथे ईश्वर आहे." होय. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे,

प्रेमाञ्जनच्छुरितभक्तिविलोचनेन |
सन्तः सदैव हृदयेषु विलोकयन्ति ||
यं श्यामसुन्दरमचिन्त्यगुणस्वरूपं |
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
(ब्र. स. ५.३८)

पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्यामसुंदर आहेत. शामसुंदर. श्याम म्हणजे काळसर, पण खूप खूप सुंदर. ते सर्वात सुंदर व्यक्ती, सर्वश्रेष्ठ व्यक्ती, कृष्ण, सर्वदा संतांद्वारे पाहिले जातात. प्रेमानञ्जनच्छुरितभक्तिविलोचनेन. ते कसेकाय पाहत आहेत? कारण प्रेमाच्या काजळाने त्यांचे नेत्र स्वच्छ झाले आहेत. ज्याप्रमाणे तुमच्या डोळ्यांत काही बिघाड झाल्यावर चिकित्सकाकडून तुम्ही काही काजळ किंवा मलम घेता, आणि त्याचा वापर केला तर तुम्ही सर्व गोष्टी स्पष्टपणे पाहू शकता. त्याचप्रमाणे जेव्हा तुमचे भौतिक डोळे भगवत्प्रेमाच्या काजळाने स्वच्छ होतील तेव्हा तुम्ही भगवंतांना पाहू शकाल, "येथे आहेत भगवंत." तुम्ही तेव्हा असे नाही म्हणणार, की भगवंत अस्तित्वात नाहीत. आणि ते आवरण दूर करावे लागेल, आणि ते आवरण दूर करण्यासाठी तुम्हाला या कृष्णभावनामृत आंदोलनाचा स्वीकार करावा लागेल. धन्यवाद.