MR/Prabhupada 0310 - येशू ख्रिस्त हे भगवंतांचे दूत आहेत, व हरिनाम स्वतः भगवंत आहेत



Lecture -- Seattle, October 2, 1968

प्रभुपाद : होय?

महापुरुष : प्रभुपाद, हा विरोधाभास नाही का, की येशू ख्रिस्त व भगवान चैतन्य दोघेही कलियुगात अवतीर्ण झालेत, आणि येशू ख्रिस्त म्हणालेत की "भगवंताकडे जाण्याचा मार्ग केवळ माझा मार्ग आहे. केवळ माझ्यावर विश्वास ठेवा व मला शरण या." आणि भगवान चैतन्यांनी शिकविले की हरिनाम हाच आध्यात्मिक साक्षात्काराचा या युगातील एकमेव मार्ग आहे?

प्रभुपाद : मग यात भेद कोठे आहे? जर येशू ख्रिस्त म्हणतात, "माझा मार्ग", त्याचा अर्थ असा होतो की ते भगवंताचे दूत आहेत, आणि हरिनाम स्वतः भगवंत आहेत. त्यामुळे भगवंताच्या दूतामार्फत किंवा स्वतः भगवंतामार्फत, गोष्ट एकच आहे. भगवंत किंवा त्यांच्या दूतांत काहीही अंतर नाही. या साधारण व्यवहारातही, जर मी माझ्या प्रतिनिधीला पाठवेल, जर तो माझ्या वतीने स्वाक्षरी करेल, तर मला ते स्वीकारावे लागेल, कारण तो माझा प्रतिनिधी आहे. त्याचप्रमाणे भगवंतही त्यांच्या किंवा त्यांच्या दूताच्या माध्यमातूनच प्राप्त होतात. सारखीच गोष्ट आहे. फरक फक्त समजुतीचा आहे. कारण येशू ख्रिस्तांनी एका अशा समाजाला शिकवण दिली जो अतिशय प्रगत नव्हता. तुम्ही जाणता की असे हे महान, भगवद्भावनाभावित व्यक्तिमत्त्व सुळावर चढवण्यात आले. अशा समाजाची स्थिती पहा. दुसऱ्या शब्दांत, तो एक मागासलेला समाज होता. त्यामुळे अशा समाजातील लोक भगवंताचे संपूर्ण तत्त्वज्ञान जाणून घेण्यास परिपक्व नव्हते. तेवढेही पुरेसे आहे. "भगवंताने निर्माण केले आहे. याचा स्वीकार करा." ते सृष्टी कशी अस्तित्वात आली हे जाणून घेण्यासाठी तितके समजूतदार नव्हते. जर ते समजूतदार असते, तर त्यांनी येशू ख्रिस्तांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला सुळावर दिले नसते. त्यामुळे आपण जाणून घ्यायला हवे की समाजाची परिस्थिती काय आहे. जसे की कुराणात मुहम्मद म्हणतात, "यापुढे तुम्ही तुमच्या आईसोबत लैंगिक संबंध ठेवू नका." अशा समाजाची परिस्थिती कशी असेल ते पहा. त्यामुळे आपण वेळ, परिस्थिती, समाज या सर्वांची जाणीव ठेवून प्रचार करायला हवा. त्यामुळे अशा समाजासाठी भगवद्गीतेत सांगितलेल्या उच्च दर्जाच्या तात्त्विक गोष्टी जाणून घेणे शक्य नाही, जे भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे. परंतु मूलभूत तत्त्व हे, की भगवंत हे सर्वोच्च सत्ता म्हणून बायबल व भगवद्गीता अशा दोघांमध्ये स्वीकारण्यात आले आहेत. बायबलच्या सुरुवातीला येते, "भगवंत हेच सर्वोच्च सत्ता आहेत," आणि भगवद्गीता निष्कर्ष देते, "तुम्ही शरणागत व्हा." काय अंतर आहे? केवळ काळ, समाज, ठिकाण व लोक यांच्या अनुसार वर्णन आहे. बस. ते काही अर्जुन नाहीत. कळले? अर्जुनाद्वारे समजल्या जाणाऱ्या गोष्टी येशू ख्रिस्तांना सुळावर चढवणाऱ्यांना समजावणे शक्य नव्हते. तुम्हाला या जाणिवेने अभ्यास करावा लागेल. सारखीच गोष्ट आहे. एक शब्दकोश, पॉकेट शब्दकोश, लहान मुलांचा शब्दकोश, आणि आंतरराष्ट्रीय शब्दकोश, सर्व शब्दकोशच आहेत, परंतु मूल्य वेगळे आहे. एक शब्दकोश लहान मुलांसाठी आहे, आणि दुसरा शब्दकोश मोठ्या विद्वानांसाठी आहे. पण यांच्यातील एकालाही तुम्ही 'तो शब्दकोशच नाही,' असे म्हणू शकत नाही. तसे तुम्ही म्हणूच शकत नाही. त्यामुळे आपण काळ, ठिकाण, लोक अशा सर्वांना विचारात घ्यायला हवे. जसे की भगवान बुद्ध, ते म्हणाले की, "ही प्राण्यांना मारण्याची वेडगळ पद्धत बंद करा." हा त्यांचा उद्देश होता. ते अत्यंत मागासलेले लोक होते, केवळ प्राण्यांच्या हिंसेत त्यांना आनंद वाटत असे. त्यामुळे त्यांचा स्तर उंचावण्यासाठी भगवान बुद्धांना हा वेडेपणा बंद करायचा होता : "हिंसा करू नका." त्यामुळे प्रत्येक वेळी भगवंत, किंवा त्यांचे प्रतिनिधी, लोकांना शिकवण देण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीत अवतीर्ण होतात. त्यामुळे परिस्थितीनुसार विवेचनात काही अंतर असू शकते, परंतु मूळ तत्त्व सारखेच राहते. भगवान बुद्ध म्हणाले, "ठीक आहे, भगवंत अस्तित्वात नाही, पण तुम्ही मला शरण या." तर यात फरक कोणता आहे? याचा अर्थ असा की आपल्याला भगवंताची सर्वोच्च सत्ता या किंवा त्या मार्गाने स्वीकारावी लागेल.