MR/Prabhupada 0315 - आपण फारच हट्टी आहोत, आपण श्रीकृष्णांना वारंवार विसरण्याचा प्रयत्न करतो



City Hall Lecture -- Durban, October 7, 1975

बंधू आणि भगिनींनो, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. हे आंदोलन मी सुरू केलेले नाही. हे अनेको वर्षांपूर्वी स्वतः श्रीकृष्णांनी सुरू केले होते. सर्वप्रथम, त्यांनी हे भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सूर्यदेवाला सांगितले. जसे भगवद्गीतेच्या चवथ्या अध्यायात सांगण्यात आले आहे,

इमं विवस्वते योगं
प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान् मनवे प्राह
मनुरिक्ष्वाकवेsब्रवीत् ।।
(भ. गी. ४.१)

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । (भ. गी. ४.२.) मग जर आपण मनूचे वय मोजू, तर ते चार कोटी वर्षे आहे असे कळते. त्यामुळे कृष्णांनी ते किमान चार कोटी वर्षांपूर्वी सांगितले होते, त्यांनी हे भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सूर्यदेव विवस्वान याला सांगितले. सूर्यलोकाच्या अधिष्ठात्या देवतेचे नाव विवस्वान आहे. त्याचा मुलगा, मनू, वैवस्वत मनू... त्याचा मुलगा इक्ष्वाकू, सूर्यवंशातील मूळ व्यक्ती, ज्यात भगवान श्रीरामचंद्र अवतीर्ण झाले, इक्ष्वाकू... तर या पद्धतीने हे कृष्णभावनामृत आंदोलन फार फार जुन्या काळापासून चालत आले आहे. पण कृष्ण म्हणतात, एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः (भ. ग. ४.२): "पूर्वी राजर्षी हे तत्त्वज्ञान गुरुपरंपरेच्या माध्यमातून प्राप्त करत असत." भगवद्गीता समजून घेण्याचा हा मार्ग होता. पण कृष्ण म्हणतात, स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप । आता जेव्हा पाच हजार वर्षांपूर्वी कृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाशी बोलत होते, जेव्हा तो युद्ध करावे की करू नये या गोंधळात पडला होता, आणि केवळ त्याला युद्ध करण्यास प्रेरित करण्यासाठी त्यांनी अर्जुनाला पाच हजार वर्षांपूर्वी भगवद्गीता सांगितली. आणि तेव्हा त्यांनी सांगितले की "ती गुरुपरंपरा आता नष्ट झाली आहे; त्यामुळे हे तत्त्वज्ञान मी पुन्हा आता तुला सांगत आहे, जेणेकरून लोक या तत्त्वज्ञानाचे, कृष्णभावनामृताचे तात्पर्य तुझ्याकडून समजून घेतील." तर मग पाच हजार वर्षांपूर्वी हे तत्त्वज्ञान अर्जुनाला सांगण्यात आले होते, आणि आपणही तेच ग्रहण करीत आहोत. मात्र दुर्दैवाने ते तत्त्वज्ञान पुन्हा बिघडविले जात आहे. आपण ते परंपरा-पद्धतीने प्राप्त करत नाही, आणि त्यामुळे आपण मनाप्रमाणे आपले स्वतःचे निष्कर्ष काढतो, आणि त्यामुळे तीही नष्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा पाचशे वर्षांपूर्वी, श्री चैतन्य महाप्रभूंनी भक्ताच्या स्वरूपात या भगवद्गीतेचा उपदेश केला. श्री चैतन्य महाप्रभू हे श्रीकृष्णांचे अवतार आहेत असे मानले जाते. भगवान कृष्णांच्या स्वरूपात त्यांनी एखाद्या आदेश देणाऱ्या गुरूप्रमाणे शिकविले, सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भ. ग. १८.६६), पण तरीही, लोकांनी गैरसमज करून घेतला. त्यामुळे यावेळी, पाचशे वर्षांपूर्वी, भगवान श्री चैतन्य महाप्रभू, कृष्ण स्वतः, भक्ताच्या रूपाने अवतीर्ण झाले. श्री चैतन्य महाप्रभू हे कृष्णच आहेत. हे अधिकृत शास्त्रांत प्रतिपादित करण्यात आले आहे : कृष्णवर्णं त्विषाकृष्णं साङ्गोपाङ्गास्तत्रपार्षदम् । यज्ञैः सङ्कीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः ।। (श्री. भा. ११.५.३२) त्यामुळे हे कृष्णभावनामृत आंदोलन वस्तुतः श्री चैतन्य महाप्रभूंचे आंदोलन आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभू हे स्वतः श्रीकृष्णच आहेत. तर कृष्ण हे बद्ध जीवांविषयी अतिशय दयाळू आहेत. ते त्यांना कृष्णभावनेच्या मूळ स्तरावर आणण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात. पण आपण इतके हट्टी आहोत, आपण श्रीकृष्णांना वारंवार विसरण्याचा प्रयत्न करतो. हे चालूच असते.