MR/Prabhupada 0319 - भगवंतांना व भगवंतांचे दास या स्वतःच्या स्वरूपाला स्वीकारा, आणि भगवंतांची सेवा करा



Room Conversation with Sanskrit Professor, other Guests and Disciples -- February 12, 1975, Mexico

अतिथी (४) : येथे धर्म म्हणजे श्रद्धा की कर्तव्य?

प्रभुपाद : नाही, धर्म म्हणजे कर्तव्य, वर्णाश्रम धर्म. त्याचा सुद्धा त्याग केलेला आहे. याचा अर्थ असा की एकमात्र कर्तव्य उरते ते म्हणजे कृष्णभावनामृत. ते म्हणतात, सर्वधर्मान्परित्यज्य. सुरुवातीला ते सांगतात धर्मसंस्थापनार्थाय. होय. युगे युगे सम्भवामि. आता ते म्हणाले की "धर्माच्या तत्त्वांची स्थापना करण्यासाठी मी अवतीर्ण होतो." आणि शेवटच्या टप्प्यात ते म्हणतात, सर्वधर्मान्परित्यज्य. याचा अर्थ असा की जगात सुरू असलेले तथाकथित धर्म हे खरे नाहीत. आणि म्हणूनच भागवत म्हणते, धर्मः प्रोज्झितकैतवोsत्र (श्री. भा. १.१.२), ते म्हणते की "येथे सर्व प्रकारचे नकली धर्म नाकारण्यात आले आहेत." नकली धर्म, हे काय आहे? नकली... अगदी सोन्याप्रमाणे. सोने हे सोनेच आहे. जर ते सोने एखाद्या हिंदूच्या हातात असले, तर त्याला हिंदू सोने म्हणतात का? त्याचप्रमाणे, धर्म म्हणजे भगवंतांच्या आदेशाचे पालन करणे. तर मग हिंदू धर्म कोठे आहे? ख्रिश्चन धर्म कोठे आहे? मुस्लिम धर्म कोठे आहे? भगवंत सर्वत्र आहेत, आणि त्यांच्या आदेशांचे पालन करणे हेच आपले कार्य आहे. हा एकच धर्म आहे. भगवंतांच्या आदेशांचे पालन करणे. मग लोकांनी इतके सगळे धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, हा धर्म, तो धर्म, हे सगळे धर्म का निर्माण केलेत? त्यामुळे हे सर्व नकली धर्म आहेत. खरा धर्म म्हणजे आज्ञा पाळणे... धर्मं तु साक्षाद्भगवत्प्रणीतम् । (श्री. भा. ६.३.१९). अगदी कायद्याप्रमाणे. कायदा शासन तयार करते. कायदा हा हिंदू कायदा, मुस्लिम कायदा, ख्रिश्चन कायदा, हा कायदा, तो कायदा, असा असू शकत नाही. कायदा सर्वांसाठी असतो. शासनाचा आदेश पाळणे. हाच कायदा आहे. त्याचप्रमाणे, धर्म म्हणजे भगवंतांच्या आदेशांचे पालन करणे. जर भगवंतांचीच संकल्पना नसेल, तर मग धर्म कोठे आहे? तो तर नकली धर्म आहे. त्यामुळे तुम्हाला भागवतात सापडेल, धर्मः प्रोज्झितकैतवोsत्र : (श्री. भा. १.१.२) "सर्व प्रकारचा नकली धर्म नाकारण्यात आला आहे." आणि कृष्णही तीच गोष्ट सांगतात, सर्वधर्मान्परित्यज्य : (भ. गी. १८.६६) "तुम्ही सर्व प्रकारच्या नकली धर्मांचा त्याग करा. तुम्ही केवळ मला शरण या. तोच खरा धर्म आहे." नकली धर्माबद्दल चिंतन करत राहण्याचा काय उपयोग आहे? तो तर धर्मही नाही. जसे की नकली कायदा. कायदा नकली असूच शकत नाही. कायदा कायदा असतो, शासनाने निर्माण केलेला. त्याचप्रमाणे धर्म म्हणजे भगवंतांनी दिलेला आदेश. तोच खरा धर्म आहे. जर तुम्ही त्याचे अनुसरण करणार, तर तुम्ही धार्मिक आहात. जर तुम्ही अनुसरण करणार नाहीत, तर तुम्ही असुर आहात. गोष्टी फारच सोप्या ठेवा. मग अशा सोप्या गोष्टी सर्वजणांना आपलेसे करणाऱ्या ठरतील. त्यामुळे हे कृष्णभावनामृत आंदोलन या सर्व गोष्टींना अतिशय सोपे करण्यासाठी आहे. भगवंत आहेत हे स्वीकारा, तुम्ही भगवंतांचे दास आहात हे स्वीकारा, आणि भगवंतांची सेवा करा. बस, एवढ्या तीनच गोष्टी.